Jivamrut Organic Slurry Benefits:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो दिवसेंदिवस रासायनिक खतांचा (Chemical Fertilizers) अधिक वापर होत असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये असलेले फायदेशीर जिवाणू (Beneficial Bacteria) त्या जिवाणूंचे प्रमाण कमी होत आहे आणि याच कारणामुळे आपल्या पिकांची वाढ कमी होणे किंवा पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या कमी लागणे, उत्पादन कमी होणे असे अनेक कारणे आपल्यासमोर येत आहे.
रासायनिक खतांचा होणारा अधिक वापर कमी करून जैविक स्लरी म्हणजे जिवाणू जन्य घटकांचा वापर कशा पद्धतीने आपल्याला आधी करता येईल या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
जीवामृत म्हणजे काय? जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे घटक. जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया. जीवामृत तयार करण्यासाठी लागणारी कालावधी. जीवामृत चा वापर आणि होणारे फायदे संपूर्ण माहिती आपण सविस्तर घेणार आहोत तरी माहिती शेवटपर्यंत वाचा.
1- जीवामृत म्हणजे काय:-
जीवामृत ही एक जैविक स्लरी (Organic Slurry) असून जैविक घटकांचा (Organic Product) वापर करून अत्यंत कमी खर्चामध्ये (Cheap Cost) कमी वेळेमध्ये (Less Time) तयार केलेले खत असून या खतामध्ये फायदेशीर जीवाणूंचे प्रमाण अधिक असतात, त्यामुळे आपल्या पिकामध्ये पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी तसेच उत्पादन वाढवण्यासाठी ही स्लरी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे.
2- जीवामृत जैविक स्लरी तयार करण्यासाठी लागणारे घटक:-
शेतकरी बंधूंनो जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला अत्यंत कमी खर्च लागणार आहे. कारण लागणारे घटक तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध होणार आहे. विकत घेण्याची गरज पडणार नाही.
घटक पहिला :- 200 लिटर जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर प्लास्टिक ड्रम तसेच 20 लिटर ची प्लास्टिक बकेट.
घटक दुसरा :- गावरान गाईचे 10 लिटर गोमूत्र लागणार आहे. मित्रांनो गावरान गाईचे गोमुत्रच घ्या कारण या मध्ये जिवाणूंचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे जीवामृत उत्कृष्ट क्वालिटी चे तयार होते.
घटक तिसरा :- गावरान गाईचे शेण 10 किलो. शक्यतो शेण गावरान गाईचे घ्या कारण या गाईच्या शेणात पिकासाठी फायदेशीर जिवाणूंचे प्रमाण अधिक असते.
घटक चौथा :- बेसन पीठ 1 किलो घ्या कारण जिवाणूंचे खाद्य पदार्थ म्हणून हे काम करते.
घटक पाचवा :- गावरान गुळ 1 किलो घ्या. गावरान गुळात कार्बोहाइड्रेट, सुगर, लोह या सारखे पोषक घटक असतात त्यामुळे जैविक स्लरी मध्ये जिवाणूंचे प्रमाण वाढते.
घटक सहावा :- माती 2 किलो लागणार आहे त्यामुळे 2 किलो माती घ्या परंतु माती झाडा खालील किंव्हा बांधावरील असावी त्यामागचे कारण या मातीत जिवाणूंचे प्रमाण अधिक असते.
शेतकरी बंधूंना सर्वप्रथम 20 लिटर बकेट मध्ये 10 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये वरील सामग्री पूर्णपणे मिक्स करावी आणि त्यानंतर ही सामग्री तुम्हाला 200 लिटर ड्रम मध्ये टाकायचे आहे आणि 200 लिटर ड्रम मध्ये टाकल्यानंतर ड्रम शक्यतो सावलीमध्ये झाडाखाली असावा उन्हामध्ये ड्रम ठेवू नये, कारण उन्हामध्ये ड्रम ठेवल्यामुळे जिवाणूंना त्याचा विपरीत परिणाम होतो आणि जिवाणूंची संख्या कमी होते तसेच थंड ठिकाणी जर तुम्ही हा ड्रम ठेवला तर तुमच्या या जैविक स्लरी मध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक वाढणार आहे याचा मोठा फायदा तुमच्या पिकासाठी होणार आहे.
शेतकरी बंधूंनो 200 लिटर प्लास्टिक ड्रम मध्ये ही सामग्री टाकल्यानंतर तुम्हाला एक लाकडी काठीच्या सहाय्याने ती सामग्री पूर्णपणे ढवळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ओल्या पोत्याच्या सहाय्याने हा ड्रम तुम्हाला झाकून घ्यायचा आहे. मित्रांनो 07 किंवा 08 दिवसांमध्ये हे जीवामृत तयार होणार आहे, परंतु या 07 ते 08 दिवसांमध्ये तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ अश्या पद्धतीने दिवसातून 02 वेळा ही सामग्री ढवळून घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही टाकलेली सामग्री पूर्णपणे त्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि जिवाणूंचे प्रमाण वाढेल.
3- जीवामृत तयार होण्यासाठी लागणारी कालावधी :-
शेतकरी मित्रांनो जीवामृत हे 200 लिटर ड्रम मध्ये सामग्री मिक्स केल्यानंतर 07 ते 08 दिवसांमध्ये पिकांना वापरण्यासाठी तयार होते परंतु या 07 ते 08 दिवसांमध्ये तुम्हाला हे द्रावण दिवसातून कमीत कमी दोन वेळा पूर्णपणे लाकडी काठीच्या सहाय्याने ढवळून घ्यायचे आहे. त्यानंतर 07 ते 08 दिवसांनी तुम्ही हे जीवामृत एका चाळणीच्या किंवा सुती धुडक्याच्या साह्याने पूर्णपणे हे जीवामृत गाळून घ्या आणि जे द्रावण आहे ते द्रावण तुम्ही तुमच्या पिकाला अळवणीच्या माध्यमातून देऊ शकता.
प्रत्येकी एक महिन्याच्या अंतराने तुम्ही या जीवामृत चा वापर कुठल्याही पिकासाठी करू शकता.
4- जीवामृत वापरण्याचे फायदे:-
1- जीवामृत वापर केल्यामुळे पिकाची वाढ जोमदार आणि निरोगी होते.
2- जीवामृत चा वापर केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे आपल्या पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
3- जीवामृत चा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारे फायदेशीर जीवाणू त्या जिवाणूंचे प्रमाण वाढते तसेच जमिनीची सुपीकता वाढते.
4- जीवामृत तयार करण्यासाठी अत्यंत कमी, खर्च कमी वेळ आणि याचा वापर केल्यामुळे उत्पादनातही चांगली वाढ होते.
5- जीवामृत चा वापर तुम्ही तृणधान्य, कडधान्य, तेलवर्गीय, फळवर्गीय, अशा प्रत्येक पिकांमध्ये करू शकता याचा वापर केल्यामुळे या पिकातील पांढऱ्या मुळांची संख्या वाढते.
5- जीवामृत वापरणे काळाची गरज:-
शेतकरी बंधूंनो आपण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करत आहोत रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करत असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जिवाणूंचे प्रमाण कमी झालेले आहे त्यामुळे अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर आपला उत्पादन खर्चही वाढलेला आहे हा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी जीवामृत ही काळाची गरज झालेली आहे जीवामृत तयार करण्यासाठी खर्च कमी लागतो तसेच वेळही कमी लागतो आणि याचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये जिवाणूंचे प्रमाण वाढवून उत्पादनही वाढते धन्यवाद.